चोपडा तालुक्यातील विवाहितेवर अत्याचार : दोघा आरोपींना अटक
चोपडा (सोमवार, 20 जुलै 2026) :मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या विवाहितेवर दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना चोपडा तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण ?
16 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडिता एकटी असल्याचे पाहून धानोरा येथील जितेंद्र रामदास भोई (33) आणि गणेश सुकदेव भोई (23) यांनी पीडीतेला जबरदस्तीने मद्य पाजले आणि दुचाकीवरून एका निर्जन नाल्याजवळ नेले. तेथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
अत्याचाराच्या घटनेनंतर पीडिता घरी परतल्यानंतर तिने पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या पतीने अडावद पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी 18 जुलै रोजी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.



