शाळा-महाविद्यालयाच्या नावाखाली तरुणींचे तरुणांसोबत जंगलात पर्यटन : जळगाव पोलिसांच्या कारवाईने खळबळ
अल्पवयीन मुलींच्या पालकांना बोलावून समूपदेशन : गुन्हा घडण्यापूर्वीच जळगाव पोलीस सतर्क
जळगाव (सोमवार, 20 जुलै 2026) : शहरातील विविध भागातील अल्पवयीन मुली व महाविद्यालयीन मुली शाळा व महाविद्यालयाच्या नावाखाली तरुणांसोबत निर्जन जंगलात आढळल्यानंतर जळगाव पोलीस दलाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मुलींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दात समज देण्यात आली. जळगाव शहरात महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने आज विविध भागांत विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान मेहरूण परिसर, कोल्हे हिल्स परिसर तसेच सरस्वती विद्यालय परिसरात गस्त घालून कारवाई करण्यात आली. या कारवाईने निर्जन जागी होणार्या गैरप्रकारांना आळा बसला.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी साधला संवाद
यावेळी दामिनी पथकाने काही महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. महिलांच्या सुरक्षिततेबाबत, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
तपासणीदरम्यान काही अल्पवयीन मुली घरच्यांना कॉलेजला जात असल्याचे सांगून बाहेर पडल्याचे आढळले. या मुली काही अल्पवयीन मुलांसोबत शहराबाहेरील दुर्गम परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. दामिनी पथकाने संबंधित मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केले.
त्यानंतर संबंधित पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. पालकांकडून लेखी हमी व सही घेऊन मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन दामिनी पथकाकडून करण्यात आले.



