रावेर तालुका हादरला : जमिनीच्या वादातून काकाची हत्या : आरोपी पुतण्या जाळ्यात
अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न रावेर पोलिसांनी उधळला : वैज्ञानिक तपास, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खुनाचा उलगडा
रावेर (बुधवार, 22 जुलै 2026) : जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने स्वतःच्या काकाची काठीने मारहाण करीत हत्या केली मात्र खुनानंतर हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्यासाठी मृतदेह नाल्याजवळ फेकून देण्यात आला. रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने, वैज्ञानिक पद्धतीने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली.
काय घडले रावेर तालुक्यात
मंगळवार, 21 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारबेडा येथे रामा थावरू बारेला (54) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीत मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डोक्यात काठी मारून हत्या
तपासादरम्यान घटनास्थळावरील भौतीक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासात मृताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (29, रा.गारखेडा, ता.रावेर, जि.जळगाव) याच्याशी जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. तपासात पुढे उघड झाले की, मंगळवार, 21 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजेच्या सुमारास आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या भीषण हल्ल्यात रामा बोरेले यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे 20 ते 25 मीटर अंतरावर नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल.
मात्र रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास पद्धतींचा वापर करून हा बनाव उधळून लावला. आरोपी अनिल बारेलाला बुधवार, 22 जुलै 2026 रोजी रात्री अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील, रावेर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी केली.




