गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव (गुरुवार, 23 जुलै 2026) : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे नाशिराबाद येथे हरीत यज्ञ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात प्रा. अँजेला एलिस, प्रा.निलेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार चतुर्थ वर्ष विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.हरीत यज्ञाची सुरुवात पर्यावरण संरक्षणाच्या सामूहिक संकल्पाने झाली. यावेळी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हवामान बदल, वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण या विषयांवर आकर्षक व आशयपूर्ण पोस्टर्स सादर करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.त्यानंतर जनजागृती मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण सत्रात वृक्षांचे मानवी आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासातील महत्त्व, वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जनजागृती रॅली हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणा देत नाशिराबाद परिसरात फेरी काढली.
झाडे लावा, झाडे जगवा, हरित पृथ्वी, निरोगी जीवन, एक विद्यार्थी – एक वृक्ष अशा घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. रॅलीद्वारे नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.यानंतर परिसरात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. आज एक वृक्ष लावा… उद्याचे भविष्य वाचवा हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



