अमळनेरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : ज्या भागात दहशत तेथूनच गुन्हेगाराला चौकीपर्यंत पायी फरकटत आणले
अमळनेर (शनिवार, 25 जुलै 2026) : अमळनेर शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) याला अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत थेट गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणले. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली. नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे.
पोलिसांकडे वाढल्या तक्रारी
राजेश निकुंभ याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह (कलम 307) विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर असूनही गांधीपुरा परिसरात नागरिकांना चाकूचा धाक दाखवणे, धमकावणे, मारहाण करणे तसेच लूटमारीसारखे प्रकार करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजता पोलीस पथकासह त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गांधीपुरा पोलीस चौकीत आणून त्याची कसून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. त्यामुळे त्याला कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा देत समज देण्यात आली. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा संदेश नागरिकांमध्ये गेला आहे.



