बनावट शालार्थ आय.डी.घोटाळा : जळगावतील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकरांना धुळ्यात बेड्या
धुळे (शनिवार, 25 जुलै 2026) : जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (66) यांना धुळ्यातून नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट शालार्थ आयडी तयार करून राज्य शासनाची तब्बल 190 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारी अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिक्षण विभाागतील अधिकार्यांचे काळे कारनामे पुन्हा चव्हाट्यावर आले असून आगामी काळात आणखी काहींवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट आहे.
190 कोटींचा घोटाळा
जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना हिंगोणेकर यांनी कोणत्याही वैध प्रस्तावाशिवाय बोगस वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या महाघोटाळ्यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील तब्बल 459 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या नावाने खोटे आणि बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करण्यात आले. या बनावट आयडींच्या माध्यमातून शासनाकडून नियमित वेतन (पगार) आणि मोठ्या रकमेची थकबाकी उकळण्यात आली. शासनाची एकूण 190 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
1200 हून अधिक आरोपींचा समावेश
या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असून, यामध्ये केवळ एक-दोन अधिकारी नाही, तर साखळी पद्धतीने काम झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे एक हजार 200 आरोपी निष्पन्न झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागातील इतर लिपिक व अधिकार्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
धुळ्यात सापळा रचून अटक
नाशिक शहर गुन्हे शाखेला हिंगोणेकर यांच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने धुळे शहरात सापळा रचला. धुळ्यातील नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या हिंगोणेकर यांना गुरुवारी मध्यरात्री पथकाने ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणून अधिकृतरीत्या अटक करण्यात आली.



