चाळीसगावात घरफोडी : अडीच लाखांचा ऐवज लंपास
चाळीसगाव (शनिवार, 25 जुलै 2026) : चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील भूषण मंगल कार्यालय परिसरात बंद घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 54 हजार 340 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंद घराला केले टार्गेट
गजानन कन्स्ट्रक्शन, भूषण मंगल कार्यालयाजवळ राहणारे चंदन बाळकृष्ण अमृतकर हे पत्नीसह 8 जुलै रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दरम्यान, 21 जुलै रोजी रात्री सुमारे 10 वाजता शेजारी पंकज काळे यांनी अमृतकर यांना फोन करून घराच्या लोखंडी गेटसह मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. शेजार्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
अमृतकर कुटुंब 23 जुलै रोजी घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता किचन व बेडरूममधील लोखंडी कपाटांचे दरवाजे तोडलेले असल्याचे आढळले. कपाटात ठेवलेली 20 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचा नेकलेस, सोन्याची पोत, अंगठी तसेच सोन्याचे तुकडे असा एकूण 2 लाख 54 हजार 340 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
ही चोरी 8 जुलै रोजी सकाळी 8 ते 21 जुलै रोजी रात्री 10 या कालावधीत घडल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चंदन अमृतकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहेत.



