दोन दिवसांपासून बेपत्ता वड्रीतील इसमाचा शेतविहिरीत मृतदेह आढळला
यावल (शनिवार, 25 जुलै 2026) : यावल तालुक्यातील वड्रीतील रहिवासी असलेला 45 वर्षीय इसम दोन दिवसांपासून बेपत्ता असताना त्याचा मृतदेह शनिवारी गावालगतच्या शेतविहिरीत आढळला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सिकंदर उर्फ गफ्फार इस्माईल तडवी (45) असे मृताचे नाव आहे. प्रौढाने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
बेपत्ता इसमाचा सुरू होता शोध
तडवी हे गुरूवारी दुपारी घरातून बाहेर पडले मात्र नंतर घरी परतले नाहीत. त्यांच्या पत्नीने त्यांच्या सासुला याबाबत माहिती दिली होती व तडवी हे घरी परत येतील ते वाट बघत होते. शनिवारी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील बाळकृष्ण सदाशीव यांच्या शेत विहिरीत या इसमाचा मृतदेह आढळला.
यावल पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित तडवी हवालदार, निलेश चौधरी, अर्षद गवळी, हितेश पाटील करीत आहेत.



