पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या चार दुचाकींसह चोरट्याला बेड्या


Pachora police take major action : Thief arrested along with four stolen bikes पाचोरा (सोमवार, 27 जुलै 2026) : पाचोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे खेडगावनंदीचे, ता.पाचोरा येथे चोरट्याला बेड्या ठोकत चोरी केलेल्या चार दुचाकी जप्त केल्या. जप्त दुचाकींची किंमत एक लाख 20 हजार आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना दुचाकी चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पथकाने संशयीत अमोल राजेंद्र ढमाळे (27, रा.नंदीचे खेडगाव, ता.पाचोरा, ह.मु. काळे नगर, जळगाव) यास जळगाव रोडलगत शेतातील शेडमधून ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत आरोपीने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तपासात आरोपी मास्टर कीच्या सहाय्याने बजाज प्लॅटिना मोटारसायकली चोरी करत असल्याचे उघड झाले.

चार दुचाकींबाबत गुन्हा दाखल
आरोपीने चोरी केलेल्या चारही दुचाकींबाबत भडगाव, पाचोरा आणि एमआयडीसी वाळूज (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, हवालदार विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, संदीप पाटील आणि हरीश परदेशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !