भडगाव पंचायत समितीत आढावा बैठक गाजली : आमदार किशोर पाटील यांच्याकडून अधिकारी धार्‍यावर


अशोक परदेशी
भडगाव (मंगळवार, 28 जुलै 2026) : शहरातील नारायणभाऊ मंगल कार्यालयात आयोजित पंचायत समिती अंतर्गत सर्व शासकीय विभागांची विषयानुसार आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पंचायत समिती अंतर्गत जि प अंतर्गत व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत रोजगार हमी योजनेच्या गलथान कारभारावर ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसह उपस्थित नागरीकांनी तक्रारींचा पाढा वाचला.

विविध प्रश्नांवर गाजली बैठक
बैठकीच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी घरकुल शेडगोठा रोजगार हमी योजना अंतर्गत येणारे शेत पानंद रस्ते तसेच विविध विषयांची माहिती प्रस्तावना मांडली. या माहितीच्या अनुषंगाने उपस्थित नागरिकांमधून विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सर्वात जास्त रोजगार हमी योजना अंतर्गत येणार्‍या सर्वच योजनांवर उपस्थितांकडून प्रश्नांचा भडीमार झाल्याचे दिसुन आले. यात ग्रामस्थांमधून पैसे घेतल्याचा आरोपही उपस्थित नागरीकांतुन केल्याचेही दिसुन आले. यावर संतापलेल्या आमदार किशोर पाटील यांनी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरुन कानपिचक्या दिल्या.

तर अधिकार्‍यांची गय नाही
शेतकर्‍यांची आर्थिक लूट होत असेल तर संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांची याबाबत गय केली जाणार नाही. तशा सुचना अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या. यावर गटविकास अधिकारी मात्र मौन बाळगून होते.

भडगाव तालुक्यात 37 शेतपाणंद रस्त्यांपैकी केवळ 3 रस्ते पूर्णवस्थेत असुन 34 रस्ते मात्र कागदावरच आहेत. या संबंधीत रस्त्यांचे कामे सुरू नसल्यामुळे खंत व्यक्त करण्यात आली. संबंधीत रोजगार हमी योजनेचे कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी यावेळी उपस्थित ग्रामस्थांमार्फत करण्यात आल्या.

यावेळी लोन पिराचे येथील माजी सरपंच राजेंद्र पाटील यांनी रोजगार हमी योजनेच्या कर्मचार्‍यांवर गंभीर आरोप करत या योजनेअंतर्गत जे काम मुळात अस्तित्वातच नाही किंवा बांधले गेलेले नाही अशा कामाचे पैसे संबंधित लाभार्थ्याला मिळाल्याचा आरोप केला .यावर आमदार किशोर पाटील यांनी गट विकास अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना धारेवर धरत संबंधीत प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या.

या विभागात शेतकर्‍यांकडून आर्थिक लुटी बाबत खंत व्यक्त केले तसेच चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांचा सत्कार कसा होतो. हे देखील जुवार्डी येथील ग्रामसेवक डी.एस. देवकर यांच्या सत्कार करताना आमदार किशोर पाटील यांनी मत व्यक्त केले. भडगाव पंचायत समितीवर प्रशासक असल्याने कर्मचारी मनमानी कारभार चालवत असल्याचा तक्रारी नागरिकांमधुन यावेळी करण्यात आल्या.काही गावांमध्ये 3, 3 वर्ष कामांचे एम बी रेकॉर्ड होत नाहीत. तसेच एक एका ग्रामसेवकावर 2 ते 3 ग्रामपंचायतींची जबाबदारी व पदभार असल्याने ग्रामस्थांचे कामे वेळेवर होत नाहीत. ग्रामस्थ दररोज चकरा मारुनही कामे होत नाहीत, असे प्रश्न उपस्थित नागरीकांनी उपस्थित करुन रोष व्यक्त केला. यावर आमदार किशोर पाटील यांनी कडक सुचना संबंधितांना केल्या. तालुक्यात एकूण 49 ग्रामपंचायत असून पैकी 8 ग्रामपंचायत इमारत स्थिती जीर्ण झालेली आहे. तीन ग्रामपंचायत या गावांमध्ये भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत नवीन इमारतीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची माहिती यावेळी अधिकार्‍यांनी दिली.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी व्हि. बी. रामजी योजने संदर्भात सविस्तर अशी माहिती देताना सांगितले कि, या योजना पुर्वी महात्मा गांधी रोजगार हमी योजना च्या नावाने सुरू होती ही योजना शासनाने 30 जून रोजी बंद केल्याने नव्याने ही योजना सुरू केली. या योजनेमध्ये निधीची कमतरता नसून तसेच या योजनेतील जाचक अटी शासनाने शिथिल करून नव्याने व्ही.बी.रामजी नावाने योजना 1 जुलैपासून सुरू करण्यात आल्याचे सांगत या योजनेत आमदार तसेच खासदार निधीची आवश्यकता नसल्याचेही सांगितले.

योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना घरकुल शेडगोटा शेतपाणंद रस्ते तसेच विविध योजनांचा समावेश असल्याने एकाच छताखाली असलेल्या योजनेमुळे ग्रामस्थांना फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
आढावा बैठकीला तालुक्याचे आमदार किशोर पाटील गटविकास अधिकारी के. बी. अंजने, पाचोरा, भडगाव बाजार समितीचे माजी सभापती रावसाहेब पाटील, स्विकृत नगरसेवक युवराज पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख भैय्यासाहेब पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील , संजय पाटील, बाजार समितीचे उपसभापती पी. ए. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समाधान पाटील,वडजीचे जगदीश पाटील, भडगाव शेतकरी सहकारी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र परदेशी, यांचेसह प्रदीप मालचे, तसेच तालुक् पदाधिकारी व शिंदे शिवसेनेचे पदाकार्यांची उपस्थिती दिसुन आली. जिल्हा परीषदेचे व पंचायत समितीचे आजी माजी सदस्यांची या महत्वपुर्ण बैठकीला अनुपस्थी दिसुन आल्याने उपस्थित नागरीकांमध्ये चर्चेचे गुर्हाळ पिकल्याचे दिसुन आले.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अखिलेश पाटील यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मांडुन बैठकीत वेधले लक्ष –
भडगाव तालुक्यात 5 ते 6 वर्षापासुन शेती सिंचन विहीरींचा लाभ देणे बंद आहे. भडगाव तालुका रेडझोनमध्ये समावेश झाल्याने शासनाने ही शेतकर्यांची योजना बंद केली असुन शेतकरी शासनाच्या सिंचन विहीरीच्या लाभापासुन वंचीतच आहेत. तरी शासनाने भडगाव तालुक्यातील डार्क झोन हा विषय हटवावा व शेतकर्यांना सिंचन विहीरींचा लाभ दयावा अशी मागणी मांडली. तसेच शासनाच्या गोठाशेड योजनेच्या शेतकर्यांच्या प्रलंबीत प्रकरणांना तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अखिलेश पाटील यांनी मांडली. तसेच पोखरा योजनेसाठी काही गावांचा समावेश केलेला आहे तरी उर्वरीत गावांचाही या शासनाच्या पोखरा योजनेत समावेश करावा अन शेतकर्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ दयावा अशा शेतकर्यांसाठीच्या म्हत्वपुर्ण मागण्या या आढावा बैठकीत भडगाव तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील यांनी मांडल्या. याचे उपस्थित ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसह शेतकरी, नागरीकांनी स्वागत केल्याचे दिसुन आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !