वाळू चोरट्यांविरोधात जळगाव पोलिसांनी ओढला कारवाईचा आसूड : सात डंपर, सात ट्रॅक्टरसह 88 लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव (मंगळवार, 28 जुलै 2026) : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी सोमवार, 27 जुलै रोजी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत सात डंपर, सात ट्रॅक्टर, 19.50 ब्रास वाळू असा एकूण 88 लाख सहा हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील विविध उपविभागांत एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 21 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव एमआयडीसी, यावल, मुक्ताईनगर, सावदा, बोदवड, भडगाव आणि अमळनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाया जळगाव, मुक्ताईनगर आणि अमळनेर उपविभागात करण्यात आल्या.

कारवाईदरम्यान काळ्या व पिवळ्या रंगाचे डंपर, टिप्पर तसेच मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाहतूक केली जाणारी वाळू जप्त करण्यात आली. विविध ठिकाणी महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अवैध वाळू व्यवसाय करणार्‍यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांकडून सातत्याने तपासणी केली जाणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

ही संपूर्ण विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस पथकांनी संयुक्तपणे राबविली. यात महसूल विभागानेही आवश्यक ठिकाणी सहकार्य केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !