जामनेरातील भाजप नेते संजय गरुडांना शालार्थ आयडी घोटाळ्यात बेड्या : सातारा जिल्ह्यात कारवाई


जळगाव (मंगळवार, 28 जुलै 2026) : जामनेर तालुक्यातील शेंदूर्णीचे भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान अटक करण्यात आली. राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. नाशिकच्या विशेष तपास पथकाने सोमवार, 27 रोजी रात्री उशिरा ही कारवाई केली.

बड्या हस्तींवरील कारवाईने खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. हिंगोणेकरने आपल्या पदाचा गैरवापर करत 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नियमबाह्य मान्यता दिली होती. या चौकशीदरम्यान हिंगोणेकरने दिलेल्या महितीच्या आधारे एसआयटीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, नियमबाह्य मान्यता मिळालेल्या शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे संजय गरुड यांच्याच शाळेतील असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.

160 कोटींची आर्थिक फसवणूक ; सर्वाधिक आरोपी जळगावचे
बनावट शालार्थ आयडी तयार करून तब्बल 160 कोटी रुपयांचा शासननिधी हडपल्याचा आरोप या रॅकेटवर आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यातील एकूण 481 संशयित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांपैकी तब्बल 438 जण एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये संजय गरुड हे महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले आहे.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
संजय गरुड यांनी 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. जामनेर तालुक्यातील एका वजनदार नेत्यालाच थेट सातार्‍यातून अटक झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !