गुन्ह्यात अटक न करण्यासाठी अडीच लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल


येवला (मंगळवार, 28 जुलै 2026) : येवला तालुका पोलिस ठाण्याशी संबंधित एका प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नाशिकने मोठी कारवाई करत पोलिस अधिकार्‍याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराकडून सुरुवातीला चार लाखांची लाचेची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर ही रक्कम 2.50 लाखांवर निश्चित करण्यात आली. त्यातील 50 हजारांची रक्कम फोन पे द्वारे स्वीकारण्यात आली नंतरच्या रकमेबाबत संशय आल्याने सापळा यशस्वी झाला नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच एसीबीने पोलिस उपनिरीक्षकासह दोन खाजगी पंटरांना अटक केली.

हर्षवर्धन दिलीप बहीर असे अटकेतील पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. यापूर्वी ते येवला ठाण्यात कार्यरत होते तर आता श्रीरामपूर शहर ठाण्यात कार्यरत असल्याने त्यांना नाशिक एसीबीने अटक केली तर त्यांच्यासोबत लाच मागणी करणारे व प्रोत्साहन देणारे पंटर सुनील शिवाजी बोराडे (34, पाटोदा, ता.येवला) व जगदीश तुकाराम बोराडे (37, पाटोदा, ता.येवला) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या भावाविरोधात गुन्हा दाखल न करण्यासह अटक न करण्यासाठी उपनिरीक्षक बहीर याच्या सांगण्यावरून खाजगी पंटर सुनील बोराडेने चार लाखांची लाच मागितली व अडीच लाखांवर तडजोड करण्यात आली. 9 एप्रिल रोजी उपनिरीक्षकाची भेट करून देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारण्यात आली व उपनिरीक्षकाने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले. सापळा रचण्यात आला मात्र तो यशस्वी झाला नाही मात्र लाच पडताळणीचा अहवाल येताच सोमवारी रात्री तिघा आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार नाईक करीत आहेत.

लाचखोरांविरोधात बिनधास्त करा तक्रार
भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. लाचेची मागणी झाल्यास एसीबीच्या हेल्पलाईन किंवा अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !