भुसावळातील गुन्हेगारी ठेचण्यासाठी कोम्बिंग : 25 भंगार चोरटे ताब्यात
वाण्टेड आरोपीकडून गावठी कट्टा जप्त : भंगार चोरट्यांचे धाबे दणाणले ! आरपीएफसोबत पोलिसांची संयुक्त मोहिम
Combing operation to curb crime in Bhusawal : 25 scrap thieves detained भुसावळ (बुधवार, 29 जुलै 2026) : शहरातील मंदिराच्या सेवेकर्याची तसेच नाईट ड्युटीला तैनात रेल्वे कर्मचार्याची भंगार चोरीच्या वादातून हत्या झाल्याची घटना अलीकडेच घडली होती. दोन्ही खुनांचा संबंध भंगारी चोरीशी निगडीत असल्याने पोलीस प्रशासनाने आरपीएफशी समन्वय साधत बुधवारी पहाटे शहरासह परिसरात कोम्बिंग राबवले. दीपनगराचा कोळसा तसेच रेल्वेच्या भंगार चोरट्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत करीत 60 चोरट्यांची झाडाझडती घेत 25 संशयीतांना ताब्यात घेतले तर पाच भंगार दुकानदारांच्या गोदामांची झडती घेण्यात आली. कोम्बिंगमध्ये बाजारपेठ हद्दीतील एका संशयीताकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला तर भुसावळ तालुका हद्दीतील एका गुन्ह्याची उकल करीत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. भल्या पहाटेच्या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.

भल्या पहाटे पोलिसांचे कोम्बिंग
भुसावळ शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह रेल्वे व दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार आणि कोळसा चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी बुधवारी पहाटे कोम्बिंग राबवले. या मोहिमेत फरार आरोपींना अटक, अवैध शस्त्र जप्ती, चोरीचा मुद्देमाल हस्तगत आणि संशयितांची व्यापक पडताळणी करण्यात आली.
गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात
सराईत गुन्हेगार तथा रेल्वे लोहमार्ग पोलिसांना वॉण्टेड असलेला आरोपी श्याम सुभाष शिरसाठ (उर्फ श्याम काळ्या) याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बाजारपेठ हद्दीतील एन्झेल नगर परिसरातून आरोपी शौकीब शहा शरीफ शहा याच्याकडून एक देशी कट्टा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध बाजारपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील कारवाईदरम्यान राजू मुरकाडे (रा. निंभोरा) याच्याकडून सुमारे 50 किलो केबल तसेच केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्यावर मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम 124 अन्वये कारवाई करण्यात आली तसेच केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
60 आरोपींच्या घराची झडती
रेल्वे व दीपनगर परिसरातील भंगार आणि कोळसा चोरीशी संबंधित 60 सराईत आरोपींच्या घरांची पहाटे झाडाझडती घेण्यात आली. 25 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पाच भंगार व्यावसायिकांच्या गोदामांचीही तपासणी करण्यात आली.
डिजिटल गुन्हे नोंदवही अद्ययावत
पकडलेल्या आरोपी व संशयितांचे डिजिटल रेकॉर्ड अद्ययावत करून जळगाव पोलिस दल आणि आरपीएफ यांच्यात माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली, ज्यामुळे भविष्यातील कारवायांना अधिक गती मिळणार आहे.
112 वर करा तक्रार
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, रेल्वे परिसरातील संशयास्पद हालचाली, अवैध भंगार खरेदी-विक्री किंवा कोणत्याही गुन्हेगारीविषयीची माहिती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा डायल 112 वर कळवून पोलिसांना सहकार्य करावे.
यांचा कारवाईत सहभाग
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावक्ष उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वात बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहरचे निरीखक महेश गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह नऊ अधिकारी, 30 पोलीस अंमलदार, तीन आरसीपी प्लाटून, आरपीएफचे 11 अधिकारी, 53 अंमलदार मोहिमेत सहभागी झाले.