मुक्ताईनगर तालुक्यातील हॉटेलमागे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांचा पर्दाफाश : 13 आंबट शौकीनांसह दहा महिलांवर कारवाई

बुलढाणा सीमेवरील हॉटेल परिसरात अश्लील कृत्यांवर एलसीबीचा छापा : सर्व महिला राजस्थानच्या रहिवासी


मुक्ताईनगर (गुरुवार, 30 जुलै 2026) : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली गावाजवळ, बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील काही हॉटेलांच्या मागील परिसरात राजस्थानातील महिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये (वेश्या व्यवसाय) करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाल्याने पथकाने छापा टाकून 13 पुरुष आणि 10 महिलांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

13 आंबट शौकीनांविरोधात कारवाई
पोलिसांनी संबंधितांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 110 आणि 117 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या सर्व महिला राजस्थान राज्यातील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित व्यक्तींची ओळख व इतर बाबींची पडताळणी केली जात आहे.

काय आहे मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 110 व 117?
कलम 110 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील, असभ्य किंवा समाजाला त्रासदायक वर्तन करणार्‍या व्यक्तींवर कारवाईची तरतूद आहे. तसेच महिलांची छेडछाड करणे, विनाकारण सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या रेंगाळणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणार्‍या कृत्यांवरही या कलमाचा वापर केला जाऊ शकतो.
कलम 117 हे कलम 110 च्या उल्लंघनासाठी शिक्षेची तरतूद करते. यामध्ये दंडाची शिक्षा असून प्रकरणाच्या स्वरूपानुसार कारावासाचीही तरतूद आहे.

पीटा कायदा का लागू झाला नाही?
या कारवाईत अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, 1956 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही कारण उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार मानवी तस्करी, जबरदस्ती, कुंटणखाना चालविणे किंवा वेश्या व्यवसायासाठी शोषण यासंदर्भातील पुरावे समोर आलेले नाहीत.

कायद्यानुसार 18 वर्षांवरील दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने संबंध ठेवत असतील आणि त्यामागे जबरदस्ती, मानवी तस्करी किंवा व्यावसायिक लैंगिक शोषणाचा घटक नसेल, तर केवळ त्या कारणावरून पीटा कायदा लागू होत नाही. हा कायदा मुख्यतः मानवी तस्करी, वेश्या व्यवसायासाठी चालवले जाणारे कुंटणखाने आणि महिलांचे व अल्पवयीनांचे शोषण रोखण्यासाठी करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून, तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !