सावदा पोलिसांनी रोखली गोवंशाची अवैध वाहतूक : दोन गोवंशाची सुटका : चालकाला अटक


सावदा (गुरुवार, 30 जुलै 2026) : सावदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवार, 30 रोजी पहाटे मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेले दोन गोवंश आणि एक टाटा मॅजिक पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईत सुमारे 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वाहन चालकाविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सावदा सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड यांना टाटा मॅजिक (वाहन एम.एच.02 वाय.ए.2644) मधून ख्वाजा नगर परिसरातून गोवंशांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वृंदावन मॉलसमोरील रस्त्यावर सापळा रचला.

पहाटे सहा वाजता संशयित वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनाच्या मागील बाजूस दोरीने बांधलेल्या अवस्थेत दोन गोवंश अत्यंत कमी जागेत कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळले. जनावरांच्या शरीरावर खरचटल्याच्या खुणाही दिसून आल्या.

गोवंशाची सुटका :  चालकाविरोधात गुन्हा
चौकशीदरम्यान वाहन चालकाने आपले नाव शेख तनवीर दोख खलील (7, रा. ख्वाजा नगर, सावदा, ता. रावेर) असे सांगितले. त्याच्याकडे गोवंशांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वाहतूक परवाना किंवा आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या दोन गोवंशांची अंदाजे किंमत 40 हजार, तर टाटा मॅजिक वाहनाची किंमत एक लाख असून एकूण 1.40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत पाठविण्यात आले.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बबन तडवी यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 194/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटार वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वात हवालदार उमेश पाटील, हवालदार समीर तडवी, सुनील सैंदाणे, मयूर पाटील, बबन तडवी, राहुल येवले, विकास जोशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !