बनावट शालार्थ आय.डी.घोटाळा : शेंदुर्णीतील दीपक गरुडसह चौघांना अटक

160 कोटींच्या फसवणुकीचा तपास वेगात : आरोपीला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी


जळगाव (गुरुवार, 30 जुलै 2026) : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. नाशिकच्या विशेष तपास पथकाने सोमवार, 27 रोजी रात्री जामनेर तालुक्यातील शेंदूर्णीचे भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान अटक केली होती. याच संस्थेचे शालेय सचिव दीपक काशीनाथराव गरूड (52, पारसनगर, शेंदुर्णी, जामनेर) याला नाशिकच्या विशेष पथकाने शिरपूर येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयीताला आसरा देणार्‍या तिघांनाही यंत्रणेने अटक करीत त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे.

बड्या हस्तींवरील कारवाईने खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. हिंगोणेकरने आपल्या पदाचा गैरवापर करत 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नियमबाह्य मान्यता दिली होती. या चौकशीदरम्यान हिंगोणेकरने दिलेल्या महितीच्या आधारे एसआयटीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, नियमबाह्य मान्यता मिळालेल्या शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे संजय गरुड यांच्याच शाळेतील असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.

160 कोटींची आर्थिक फसवणूक ; सर्वाधिक आरोपी जळगावचे
बनावट शालार्थ आयडी तयार करून तब्बल 160 कोटी रुपयांचा शासननिधी हडपल्याचा आरोप या रॅकेटवर आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यातील एकूण 481 संशयित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांपैकी तब्बल 438 जण एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये संजय गरुड हे महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले आहे.

दीपक गरूडसह चौघांना अटक
राज्यभर गाजलेल्या बनावट शालार्थ घोटाळ्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील संशयीत दीपक काशीनाथ गरुड याच्यासह त्याला आश्रय देणार्‍या आणखी तीन जणांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून अटक केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, 12 मार्च 2026 रोजी उघडकीस आलेल्या या प्रकरणात नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नावाने बनावट वैयक्तिक मान्यता आदेश व बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी करून वेतन व थकबाकीची रक्कम काढण्यात आली. त्यामुळे शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

आतापर्यंत 1200 आरोपी निष्पन्न
या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 1200 आरोपी निष्पन्न झाले असून, संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन अधीक्षक आदींची भूमिका तपासली जात आहे.

संशयीत आरोपीची भूमिका
अटक करण्यात आलेला दीपक काशीनाथ गरुड (वय 52, रा. पारसनगर, शेंदुर्णी, जि. जळगाव) हा शेंदुर्णी शैक्षणिक संस्थेचा सहसचिव असून, त्याने इतर आरोपींच्या मदतीने 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे बनावट मान्यता आदेश व शालार्थ आदेश हे शिक्षणाधिकारी यांच्याकडून तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तिघांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक
गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर येथे कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्याला आश्रय दिल्याच्या आरोपावरून सोपान सुपडू बारी (52, शेंदुर्णी, ता.जामनेर), पंकज माधवराव चव्हाण (42, रांजणगाव, ता.चाळीसगाव), राजवीर दीपक गरुड (18, शेंदुर्णी, ता.जामनेर) यांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांविरुद्धही भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कोठडी
संशयीत दीपक गरुड याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने 3 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !