शेअर ट्रेडींगमुळे कर्ज वाढले, पैसे कमावण्यासाठी तरुणाला एम.डी.च्या गुन्ह्यात फसवले : नांदेडच्या सूत्रधारासह भुसावळच्या आरोपीला अटक
जळगाव गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे उच्च शिक्षीत तरुण गुन्ह्यातून बाहेर : पोलिसांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीचे कौतुक
जळगाव (शुक्रवार, 31 जुलै 2026) : शेअर ट्रेडींगच्या लतमुळे कर्ज वाढले व एमडी सेवनाच्या सवयीमुळे बेजार झालेल्या आरोपीने परिचीत नातेवाईक असलेल्या उच्चशिक्षीत तरुणाला पोलिसांना टीप देत एम.डी.प्रकरणात फसवले. रामानंद पोलिसांनी त्यावेळी केलेल्या कारवाईनंतर तरुणाकडून एम.डी.जप्त करण्यात आले मात्र गुन्हे शाखेने केलेल्या समांतर तपासात तरुणाचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले तसेच नातेवाईकानेच हा प्रकार प्लाँट केल्याने त्याच्यासह भुसावळच्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धत्तीने जळगाव गुन्हे शाखेने गुन्ह्याचा तपास करीत निर्दोष तरुणाचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवल्याने या कामगिरीचे कौतुक होत आहे.

काय आहे प्रकरण ?
28 जुलै रोजी रामानंद नगर पोलिसांनी शिव कॉलनी परिसरातून मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थासह कल्पेश सतीश रायसिंग (26, वालकी, ता.चोपडा) यास अटक केली होती. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान कल्पेशने नातेवाईक जतीन रवींद्र सैंदाणे (36, नांदेड, ता.धरणगाव) याच्यावर संशय व्यक्त करीत त्यानेच जळगावात जेवणासाठी आग्रहाने बोलावल्याचे सांगितल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला वेग देण्यात आला.
तोडीपाणी करण्यासाठी आटापीटा
तपासादरम्यान जतीन रवींद्र सेंदाणे (36) यानेच पोलिसांना टीप देत पैसे उकळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. शेअरमध्ये लॉस झाल्याने पैसे कमावण्यासाठी त्याने प्लॅन केला. चेतन दत्तात्रय वानखेडे उर्फ चंदू सोनार (41, सराफ बाजार, भुसावळ) याच्याकडून त्याने एम.डी.खरेदी केले व कल्पेशच्या दुचाकी (एम.एच.19 सी.सी.5016) च्या सीटखाली लपवले. कल्पेशला 28 रोजी मुद्दाम जळगावात जेवणाचा आग्रह करीत एम.डी. वाहतुकीबाबत पोलिसांना टीप दिली. हे प्रकरण बाहेरच्या बाहेर रफादफा करू व त्यातून पैसे मिळतील हा आरोपीचा विचार होता मात्र पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल झाल्याने आरोपींचे बिंग समोर आले.
दोन्ही आरोपींना अटक
एम.डी.ड्रग्ज खरेदी करून निर्दोष तरुणाला गुन्ह्यात फसवणार्या तरुणाच्या आतेबहिणीचा पती असलेल्या जतीन रवींद्र सैंदाणे (36, नांदेड, ता.धरणगाव) व एम.डी.विक्री करणार्या भुसावळातील चेतन दत्तात्रय वानखेडे उर्फ चंदू सोनार (24) यांना आरोपी करीत त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून 5 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक संजय तडवी व गुन्हे शाखेसह रामानंद पोलिसांच्या पथकाने केली.