शिंदखेडा पोलिसांची मोठी कारवाई : बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त : 15.21 लाखांचा मुद्देमाल जप्त

एका आरोपीला अटक : विविध यंत्रसामग्री व मोठा साठा जप्त


शिंदखेडा (शुक्रवार, 31 जुलै 2026) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिसांनी मानवी जीवितास अपायकारक ठरणार्‍या बनावट देशी दारू निर्मितीच्या अवैध कारखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 15 लाख 21 हजार 796 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी चंद्रकांत धुडकू बिरारी (35, रा.माळी गल्ली, सोनगीरा) याला अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिंदखेडा शहरालगतच्या बाभळे एमआयडीसीतील प्लॉट 53 मध्ये बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारखान्यात सुरू असलेली बेकायदेशीर दारू निर्मिती उघडकीस आणली. कारवाईदरम्यान आरोपीसह दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारी विविध यंत्रसामग्री, रसायने, रिकाम्या व भरलेल्या बाटल्या, लेबले, पॅकिंग साहित्य तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

लाखो रुपयांचे साहित्य जप्त
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात स्टेनलेस स्टील मिक्सर मशीन, आर.ओ. प्लांट, पाण्याच्या टाक्या, पाण्याची मोटार, देशी दारूची लेबले, रिकाम्या बाटल्या, झाकणे, पॅकिंग साहित्य, रसायने तसेच मोठ्या प्रमाणात दारू निर्मितीचे साहित्याचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची किंमत 15 लाख 21 हजार 796 रुपये आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी मयूर भामरे, उपनिरीक्षक संदीप ढाकणे, उपनिरीक्षक माया राजपूत अंमलदार प्रशांत पवार, हेमराज जाधव, नागेश शिरसाठ, रुपेश चौधरी, गणेश सोनवणे, चेतन माळी, कमलेश कोठावदे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !