20 हजारांची लाच अंगलट : नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी स्वीकारली लाच : आरोपी सुरगाणा ठाण्यात कार्यरत
₹20,000 Bribe Backfires: Police Sub-Inspector and Middleman Trapped by ACB in NashiK नाशिक (शुक्रवार, 31 जुलै 2026) : मुलाविरोधात दाखल गुन्ह्यात दाम्पत्याला आरोपी करतो, अशी धमकी देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 50 हजारांची लाच मागून 20 हजारांवर तडजोड करीत लाच स्वीकारणार्या नाशिकमधील सुरगाणा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह पंटराला नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने पोलिस दलातील लाचखोर हादरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लाचखोरांविरोधात नाशिक परिक्षेत्रात धडक कारवाया होत असल्याने लाचखोर हादरले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
चंद्रकांत शिवाजी दवंगे (50, पिंपळगाव बसवंत , ता.निफाड) असे अटकेतील पोलीस उपनिरीक्षकाचे तर इब्राहीम करीम वाणी (28) असे अटकेतील खाजगी पंटराचे नाव आहे. दवंगे हे सुरगाणा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.



असे आहे प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, सुरगाणा पोलिसात तक्रारदाराच्या मुलाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तक्रादार व त्यांचय पत्नीला आरोपी न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत दर्वे यांनी सुरुवातीला 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली व 20 हजारात तडजोड करण्यात आली. 19 जून रोजी दाम्पत्याला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्रस्त तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.
पहिली दिवशी स्वीकारली नाही लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 21 व 24 रोजी सापळा रचला मात्र तक्रारदाराची आरोपीशी भेट झाली नाही तर 30 रोजी तक्रारदार लाच देण्यासाठी गेल्यानंतर आरोपी दवंगेने लाच घेण्यास टाळाटाळ केली.
किराणा दुकानात अखेर घेतली लाच
शुक्रवार, 31 जुलै 2026 रोजी तक्रारदाराला सुरगाणा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीजवळील रोडलगत थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दवंगे यांनी सुरगाणा पोलीस ठाण्याजवळील आदेश किराणा जनरल स्टोअर्समध्ये लाच देण्यास सांगितल्यानंतर तक्रारदाराने खाजगी पंटर इब्राहीम वाणी यास लाच रक्कम दिली व इशारा मिळताच एसीबीने सुरूवातीला पंटराच्या व नंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या मुसक्या बांधल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वात हवालदार गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, समीर शेख आदींच्या पथकाने केली.

