महिलांनो तुम्ही वापरत असलेले हार्पिक बनावट तर नाही ? धुळ्याच्या एजन्सी चालकाविरोधात चाळीसगावात गुन्हा

32 हजार 670 रुपयांचा साठा जप्त : बनावट मालाच्या विक्रीने कंपनीचे नुकसान


चाळीसगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : टॉयलेट व बाथरुम क्लीनर म्हणून प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पोहोचलेल्या नामांकीत हार्पिकची कॉपी बनवून ती ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीने पाळत ठेवून धुळ्यातील एजन्सी चालकाविरोधात चाळीसगावात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यंत्रणेने संबंधिताकडून तब्बल 33 हजारांचा साठा जप्त केला आहे.

कंपनीच्या तक्रारीवरून कारवाई
चाळीसगावातील सिग्नल पॉईंटजवळील जैन किराणा दुकानाजवळ संशयीत गोपाल शांतीलाल अग्रवाल (29, भाईजी नगर, धुळे) हा हार्पिक कंपनीचे बनावट प्रोडक्ट बनवून ग्राहकांच्या माथी मारत असल्याची बाब कंपनीच्या निदर्शनास आली होती. कंपनीच्या प्रतिनिधींनी पाळत ठेवून चाळीसगाव शहर पोलिसांची मदत घेत सोमवार, 3 रोजी कारवाई केली. अग्रवालच्या ताब्यातून 32 हजार 670 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. कंपनीचे सिनियर मॅनेजर अत्लाफ रोशन शेख (21, मोठा ताजबाग, नागपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अग्रवाल तसेच त्यास बनावट प्रोडक्टचा पुरवठा करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक कृणाल चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !