जळगावातील फळ व्यापार्याची साडेबारा लाखांची रोकड लांबवली
जळगाव (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी अनिल ओमप्रकाश मंधान यांच्या कारमधून तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी हातचलाखीने लंपास केली. गाडीचा पाठलाग करीत ऑइल लीक होत असल्याचे खोटे सांगून चोरट्यांनी ही चोरी केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले व्यापार्यासोबत ?
अनिल मंधान हे गणपती नगर येथील रहिवासी असून कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते आपल्या कारने घरी निघाले होते. याचवेळी आधीपासून त्यांच्या कारवर पाळत ठेवून असलेल्या पाच संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. गणपती नगर परिसरात पोहोचल्यानंतर चोरट्यांनी कार थांबवून गाडीतून धूर निघत असून ऑइल लीक होत असल्याची बतावणी केली.
गाडीत बिघाड झाल्याचा संशय आल्याने मंधान हे तातडीने कारमधून खाली उतरून वाहनाची पाहणी करू लागले. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारच्या मागील सीटवर ठेवलेली 12 लाख 50 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. काही क्षणातच हा प्रकार लक्षात आला मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.