धुळ्यातील लाचखोर उपनिरीक्षकासह कर्मचारी पोलीस कोठडीत
सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी पोलीस ठाण्यातच स्वीकारली होती 40 हजारांची लाच
Corrupt Sub-Inspector and staffer from Dhule remanded to police custody धुळे (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात 50 हजारांची लाच मागून 40 हजारात तडजोड करीत पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारणार्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्याला धुळे एसीबीने सोमवारी सायंकाळी अटक केली होती. अटकेतील दोघांना धुळे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, जळगाव, धुळेसह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या लाचेच्या कारवाया सुरू असल्याने लाचखोरांनी कारवाईचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे.

असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदार यांच्या सासर्याचे वलवाडी, ता.धुळे येथे स्वतःचे घर असून धुळेस्थित दाम्पत्याने या घराच्या कागदपत्रांचा वापर करून 2015 मध्ये एका फायनान्स कंपनीकडून 36 लाख 10 हजारांचे कर्ज काढले. तक्रारदाराच्या सासर्याची या प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर त्यांनी धुळे न्यायालयात अर्ज केला व सदर प्रकरणात तक्रारदार यांच्या सासर्याच्या बाजूने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 50 हजारांची लाच धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर (36) यांनी 3 रोजी मागितली होती. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवताच लाच पडताळणी करण्यात आली.
पोलीस ठाण्यातच स्वीकारली लाच
धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणेबाहेर एसीबी पथक दबा धरून बसले असताना सायंकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक तळेकर यांच्यासाठी पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे (31) यांनी लाच स्वीकारली व संकेताचा इशारा मिळताच पथकाने आधी सादरे व नंतर तळेकर यांना अटक केली. दोघा लाचखोरांना मंगळवारी धुळे एसीबीने न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल व सहकारी करीत आहेत.
लाचखोरांविरोधात द्या बिनधास्त तक्रार
शासकीय काम करून देण्यासाठी कुणी लाच मागत वा देत असल्यास धुळे एसीबीशी 02562-234020 वा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.