नंदुरबार शहर ठाण्यातील झाशीची राणी पथकाची धडाकेबाज कारवाई : कॉलेज परिसरात तलवार व कुकरीसह फिरणार्‍या तरुणाला बेड्या

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नंदुरबार शहर पोलिसांची प्रभावी मोहीम


नंदुरबार (मंगळवार, 4 ऑगस्ट 2025) : महिला, विद्यार्थिनी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘झाशीची राणी पथक’ आणि ‘दुर्गाशक्ती पथक’ यांच्या सतर्क गस्तीमुळे मोठी दुर्घटना टळली असून एका तरुणाकडून लोखंडी तलवार आणि कुकरी जप्त करण्यात आली. ही कारवाई शहरातील जी.टी.पी. महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

सतर्क गस्तीमुळे टळला गुन्हा
नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले झाशीची राणी पथक आणि दुर्गाशक्ती पथक ही विशेष महिला पथके शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या परिसरात साध्या वेशात नियमित गस्त घालतात. टवाळखोरी, महिलांची छेडछाड, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, संशयास्पद हालचाली तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ही पथके सातत्याने कार्यरत आहेत.

संशय येताच केली कारवाई
सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी जी.टी.पी. कॉलेज परिसरात नियमित गस्तीदरम्यान पथकाला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून सोनेरी मुठ असलेली मध्यम आकाराची लोखंडी तलवार आणि एक कुकरी जप्त करण्यात आली. दोन्ही शस्त्रे पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव भावेश सुनील नाईक (रा.नंदुरबार) असे असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलिस शिपाई अंजली पवार, निंबाबाई वाघमोडे, मनाली चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल विश्वनाथ नाईक, रुपेश पगारे, राजेंद्र कटके आणि नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

112 वर तत्काळ साधा संपर्क
सार्वजनिक ठिकाणी कोणीही बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगत असल्याचे, संशयास्पद हालचाली करत असल्याचे किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी दिलेली वेळेवरची माहिती गंभीर गुन्हे रोखण्यासाठी मोलाची ठरू शकते शिवाय गुन्हेमुक्त नंदुरबारसाठी पोलिस प्रशासन कटीबद्ध असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !