जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : एरंडोलचा दुचाकी चोरटा जाळ्यात
संशयीताकडून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त : वाहन चोरीसह घरफोडी व चोरीचा आरोपीविरोधात गुन्हा
Major operation by Jalgaon Local Crime Branch : Two-wheeler thief from Erandol nabbed जळगाव (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेत महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीची मोटारसायकल हस्तगत करून रेकॉर्डवरील आरोपीस अटक केली. विभोर जुलाल जाधव (एरंडोल, जि.जळगाव, ह.मु.विवरे खुर्द, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची स्थापना करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला विभोर जुलाल जाधव (एरंडोल, ह.मु.विवरे, ता.रावेर) या संशयीताची माहिती मिळाली. संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली मात्र अधिक चौकशीत त्याने जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, राहुल महाजन यांच्या पथकाने केली.