साक्री पोलिसांची मोठी कारवाई : दोन लाखांहून अधिक किंमतीचे एम.डी. व डोडा जप्त
पंजाबमधील आरोपी अटकेत : गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोल पंपाजवळ सापळा
Major action by Sakri Police : MD and poppy husk worth over two lakh rupees seized साक्री (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत साक्री पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल दोन लाख तीन हजार 25 रुपयांचे एम.डी. (मेफेड्रोन) आणि डोडा (पॉपी स्ट्रॉ) हा अंमली पदार्थ जप्त केला. अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साक्री येथे आलेल्या पंजाबमधील एका संशयित आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना गोपनीय माहिती मिळाली की, शेवाळी (ता. साक्री) गावाजवळील एच.पी. पेट्रोल पंपाशेजारील एका हॉटेल परिसरात एक इसम एम.डी. व इतर अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी मंगळवार, 4 रोजी तत्काळ सापळा रचला. दरम्यान, संशयास्पद हालचाली करणार्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकुमार मुलकराज वाल्मिकी (42, रा.मुक्तासर रोड, कोट कापूर, फरीदकोट, पंजाब, ह.मु.इंद्रा कॉलनी, वॉर्ड क्र. 1, फिरोजपूर छावणी, पंजाब) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता 18 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) – किंमत एक लाख 80 हजार तर 1.377 किलो डोडा (पॉपी स्ट्रॉ) किंमत 20 हजार 655 व 0.158 ग्रॅम डोडा पावडर – किंमत दोन 370 रुपये मिळून एकूण दोन लाख तीन हजार 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहा.निरीक्षक संतोष मुंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राठोड, पोलीस उपनिरीक्षक अशोक वळवी, पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, पोलीस अंमलदार संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील, अनिल शिंदे, संतोष मोरे, तुषार जाधव, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, मंगेश खैरनार तसेच महिला पोलीस अंमलदार नम्रता मगर आदींच्या पथकाने केली.