भरधाव बसची दुचाकीला धडक : शिरपूरातील दोघे तरुण ठार
Speeding bus hits two-wheeler: Two youths from Shirpur killed शिरपूर (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात शिरपूर तालुक्यातील भाटपुर्यातील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मन विषन्न करणारा हा भीषण अपघात शिरपूर-चोपडा रस्त्यावर बुधवार, 5 रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास घडला. चेतन योगेश गुजर (23) व कल्पेश नितीन गुजर (25, दोघे रा.भाटपुरा, ता.शिरपूर) अशी या मृत तरुणांची नावे आहेत.

जागीच झाला मृत्यू
सूत्रानुसार, बुधवारी रात्री चेतन व कल्पेश हे दुचाकीवरून घराकडे निघाले असताना जळगावकडून शिरपूरच्या दिशेने येणार्या एका भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र रोष व्यक्त केला, परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून महामार्ग पोलीस आणि शिरपूर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून नागरिकांची समजूत काढली व परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक पूर्ववत केली.
या अपघाताने भाटपुरा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली. या अपघाताचा पुढील तपास आता थाळनेर पोलीस करीत आहेत.
