60 हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यासाठी स्वीकारली लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिकमध्ये धडक कारवाई
गणेश वाघ
nashik-acb-arrests-municipal-official-60000-bribe-property-tax-case नाशिक (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागातील घरपट्टी-पाणी विभागातील सहाय्यक अधीक्षक मारुती भिमाजी डोंगरे (55) यांना तक्रारदाराकडून 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळातील लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नाशिक महानगरपालिका सिडको विभागातील कार्यालयाच्या हद्दीत ईमारतीच्या जागेत तीन गाळ्यांचे बांधकाम केले आहे. बांधकाम केलेल्या गाळ्यांची घरपट्टी आकारण्यासाठी तक्रारदार कार्यालयात आल्यानंतर त्यांनी मारुती डोंगरे यांची भेट घेतली. त्यानंतर 2 रोजी डोंगरे व पानसरे यांनी कामाची पाहणी केली व गाळ्यांचे मोजमापही केले. अनधिकृत गाळ्यांच्या बांधकामाचे गाळे भाडे आकारणी करून देण्याच्या मोबदल्यात 70 हजार तसेच गतवेळी घरपट्टी आकारली त्याचे दहा हजार असे एकूण 80 हजार रुपये लाच स्वरुपात मागण्यात आले.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी नाशिकच्या सिडको कार्यालयाजवळील गेटवर आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस हवालदार संदीप वणवे, योगेश सावळे, चालक समीर शेख आदींच्या पथकाने यशस्वी केला. तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
