भुसावळात मालमत्तेचा ताबा घेताना गोंधळ : महिला पोलिसाला चावा घेत दाम्पत्याने अंगावर ओतले पेट्रोल

दाम्पत्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा


Chaos during property possession in Bhusawal : Couple bites policewoman and pours petrol on her. भुसावळ (शनिवार, 8 ऑगस्ट 2026) : न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या पथकाशी हुज्जत घालत एका दाम्पत्याने गोंधळ घातला शिवाय महिला पोलिसाला चावा घेत जिवे मारण्याच्या धमक्या तसेच आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी अजय कन्हैय्यालाल वणसे व छाया अजय वनसे (घोडेपीर बाबा दर्गाजवळ, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले भुसावळात?
अ‍ॅड.ललित प्रभाकर तेली (44, मेहरुण, जि.जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव येथील मुख्य न्यायिक दंडाधिकारी यांच्या आदेश क्रि. फौ. ख. 629/2025 नुसार त्यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या आदेशानुसार शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे एक वाजता भुसावळ शहरातील घोडे पीर बाबा दर्गा परिसरातील प्लॉट क्रमांक 06, सर्वे नं. 99/3 येथे ताबा घेण्यासाठी ते गेले होते.



यावेळी पोलीस बंदोबस्तासाठी हवालदार प्रमोद तायडे, नाईक योगेश सावळे, पोका हेमंत जांगळे, हवालदार मीनाक्षी घेटे, रेखा वैसाने, सीमा चिखलकर हे कर्मचारी उपस्थित होते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे विधी सल्लागार सचिन श्रावगे, लीगल मॅनेजर शिवाजी बळीराम खाडे, अधिकृत अधिकारी रविंद्र नंदकिशोर पाटील, विधी अधिकारी हितेश सतीष दिक्षीत, कॅमेरामन प्रणव भास्कर येउतकर व फोटोग्राफर विजय हिरामन मराठे हेही उपस्थित होते.

घटनास्थळी अजय कन्हैयालाल वनसे यांना न्यायालयाचा आदेश दाखवून ताबा देण्याची विनंती करण्यात आली मात्र त्यांनी ताबा देण्यास नकार देत उपस्थितांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सचिन श्रावगे यांना तुम्हाला जळगावातून उचलून मारून टाकेल अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त म्हणून पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अजय वनसे यांना न्यायालयीन आदेश समजावून सांगितले मात्र त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला. यावेळी अजय वनसे यांनी आपल्या शालक आकाश गोपाल भदाने (रा. जळगाव) यास कुत्रे सोडण्यास सांगून उपस्थितांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिला कर्मचार्‍याला चावा, पेट्रोलही ओतले
काही वेळेनंतर अजय वनसे व छाया वनसे यांनी आरडाओरडा करत कारवाईत अडथळा आणला. पंचनामा सुरू असताना छाया वनसे यांनी किचनमधील पेट्रोलची बाटली आणून अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना अडवण्यासाठी गेलेल्या हवालदार मीनाक्षी घेटे यांच्या अंगावर व डोळ्यात टाकले तसेच कॉन्स्टेबल रेखा बैसाने यांच्या हाताला चावा घेऊन जखमी केले तसेच उपनिरीक्षक जाधव यांच्यासोबत अरेरावी करून गैरवर्तन करण्यात आले. घेटे यांना त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

दाम्पत्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा
संबंधित दाम्पत्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !