सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चोरी : देवीच्या मुकुटासह दागिने लांबवले


यावल (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुडा पर्वत निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. मनुदेवी व रेणुका माता यांच्या मूर्तीवरील मुकुट तसेच चांदीच्या छत्र्या असा सुमारे एक लाख 35 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना 6 जुलैच्या रात्री घडली. धार्मिकस्थळी चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मध्यरात्री झाली चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, 6 जुलैच्या संध्याकाळी साडेपाच वाजता मंदिर नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते.त्यानंतर रात्री च्या वेळी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चैनल गेटचे कुलूप तोडून तसेच गाभार्‍यातील लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोंडुन मंदिरात आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिराच्या गाभार्‍यातील मनुदेवी मातेच्या मूर्तीवरील 300 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट (किंमत 40 हजार 500) व 200 ग्रॅम वजनाची चांदीच्या धातुची छत्री (किंमत 27 हजार) तसेच रेणुका मातेच्या मूर्तीवरील सुमारे 300 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत 40 हजार 500) व 200 ग्रॅम वजनाची चांदीची छत्री किंमत (27 हजार) असा एक किलो वजनाचा एक लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी व सेवक मंदिर उघडण्यासाठी आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. यावेळी कर्मचार्‍यांनी लागलीच संस्थेच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली. आडगाव येथील रहिवासी शिवाजी प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




पोलीस अधिकार्‍यांची धाव
चोरीची माहिती मिळताच फैजपूर विभाग पोलीस उपअधिकारी अनिल बडगुजर तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी मंदिरातील विविध ठिकाणांचीही पाहणी करून चोरीच्या घटनेबाबत माहिती घेण्यात आली. दरम्यान, चोरीचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे व इतर बाबींची तपासणी करण्यात आली.

अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांची भेट
जळगाव जिल्हा अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी ही मंदिर परिसरात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी चोरीचा छडा लावून आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करावे तसेच चोरीस गेलेला ऐवज परत मिळवावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !