यावलला दुचाकींच्या दोन वेगवेगळ्या अपघातात चौघे जखमी : दोघा गंभीर जखमींवर जळगावात उपचार


यावल (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाजवळ रस्ता ओलांडणार्‍या एकाला दुचाकीने धडक दिली. या अपघातात 55 वर्षीय इसम गंभीर झाला तर चोपडा रोडावर खडकाई नदीच्या पुलावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात घडला. यात तिघे जखमी झाले तर यातील दोन गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दोघे अपघात रविवारी घडले.

अपघातांची मालिका कायम
शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी सैय्यद अशपाक सैय्यद निसार (55, रा.यावल) हे रस्ता ओलांडत असताना त्यांना यावलकडून चोपड्याकडे चांदसणी येथील दुचाकी धारकाने भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार यांनीच जखमी सैय्यद अशपाक यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.





सायंकाळी यावल येथून चोपड्याकडे दुचाकीद्वारे मुकेश दुलाराम बारेला (30, रा.जामूनझिरा) हा चोपडाकडे जात होता. दरम्यान चोपड्याकडून यावलकडे भरधाव वेगात दुचाकीद्वारे चेतन कांतीलाल बारेला (20) व दिनकर रामसिंग बारेला (16, दोघे रा.बर्‍हाणपूर) हे येत होते. त्यांनी भरधाव वेगात मुकेश बारेला याच्या दुचाकीस समोरून जबर धडक दिली. यात मुकेश बारेला हा गंभीर जखमी झाला. चेतन व दिनकर यांना किरकोळ दुखापत झाली.

जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.पवनकुमार शर्मा, अधिपरिचारिका सरला वडार, संजय जेधे यांनी प्रथमोपचार केले. मुकेश बारेला व सैय्यद अशपाक या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !