भुसावळात पोलिसांचे वॉश आऊट : शाळेलगतच्या 14 पानटपर्‍या हटविल्या : बोगस डॉक्टरांना अटक

भुसावळ उपविभागात अवैध धंदे, अतिक्रमण तसेच नियमबाह्य व्यवसायांविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम


भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : भुसावळ उपविभागात अवैध धंदे, अतिक्रमण तसेच नियमबाह्य व्यवसायांविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत विविध प्रकारच्या एकूण 62 कोप्टा कारवायांसह दारूबंदी, गावठी हातभट्टी, अतिक्रमण आणि बोगस डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली.

विशेष मोहिमेदरम्यान कोप्टा कायद्यान्वये 62 केसेस करण्यात आल्या. तसेच दारूबंदीच्या 8 आणि गावठी हातभट्टीसंदर्भात चार कारवाया करण्यात आल्या.





शालेय परिसरातील 14 पान टपर्‍या हटविल्या
भुसावळ नगरपालिकेच्या सहकार्याने शालेय परिसराच्या 100 मीटर अंतरातील 14 पान टपर्‍या तत्काळ हटविण्यात आल्या. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वातावरणाला बाधा येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली.

12 भंगार दुकानांची तपासणी
याशिवाय पोलिसांकडून 12 भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. भुसावळ नगरपालिकेच्या मदतीने नाहटा चौक आणि गांधी चौक परिसरातील अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली.

वैद्यकीय पदवी नसताना प्रॅक्टीस :  एकावर कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामनेर रोडवरील ‘जनसेवा क्लिनिक’ येथे बोगस डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.तौसीफ खान, डॉ.उमेश मुकुंद तसेच पोलीस पथकाने क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी उमेश मधुकर सपकाळे हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना क्लिनिक चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सविस्तर पंचनामा करून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार
भुसावळ उपविभागातील अवैध धंदे, अतिक्रमण आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे भुसावळ विभागाचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी सांगितले.

पोलिसांना जमलं मात्र पालिकेला का नाही?
भुसावळातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांना अतिक्रमणाने घेरले आहे. शहरातील यावल रस्त्यावर तर सर्वाधिक डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी पोलिसांना पालिका अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना बोलावत मोहिम राबवली मात्र पोलिसांना शक्य असताना पालिका अधिकार्‍यांना हे का शक्य होत नाही? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला. शहरातील जामनेर रोड, यावल रोड, जळगाव रोड तसेच अन्य भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच टपर्‍या थाटून रस्ते अडवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !