भुसावळसह अडावदमध्ये दोन बोगस डॉक्टरांवर पोलिसांची कारवाई

चोपडा तालुक्यातील वटारला बेकायदेशीर उपचार करणार्‍यावर गुन्ह्याची प्रक्रिया ; भुसावळात जनसेवा क्लिनिकवर छापा


Jalgaon Fake Doctor Action जळगाव (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : वैद्यकीय पदवी व अधिकृत नोंदणी नसतानाही डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वटार येथे एका इसमाला अ‍ॅलोपॅथिक औषधे व इंजेक्शनद्वारे उपचार करताना पकडण्यात आले तर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जामनेर रोडवरील जनसेवा क्लिनिकवर कारवाई करत डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणार्‍या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

वटार येथे बोगस डॉक्टर रंगेहात
सोमवार, 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे एक वाजता पोलिस पथक व पंचांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वटार (ता.चोपडा) येथे छापा टाकला. यावेळी अरुपकुमार अजयकुमार आढळ (41, मूळ रा. 24 परगणा, पश्चिम बंगाल, हल्ली रा.वटार) हा कोणतीही वैध वैद्यकीय पदवी अथवा वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथिक औषधे व इंजेक्शनद्वारे उपचार करताना आढळून आला.





पोलिसांनी त्याच्याकडे असलेली प्रमाणपत्रे तपासली असता प्रमाणपत्रे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घटनास्थळावरून स्टेथॉस्कोप, विविध औषधे, इंजेक्शन्स व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत रीतसर जप्ती पंचनामा करण्यात आला असून, बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, 1961 मधील कलम 33 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

भुसावळात जनसेवा क्लिनिकवर छापा
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही बोगस डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिस पथकाने जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिक येथे छापा टाकला. यावेळी उमेश मधुकर सपकाळे हे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळी सविस्तर पंचनामा केला असून संबंधित व्यक्तीला पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वैद्यकीय पदवी व अधिकृत नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणार्‍या व्यक्तींविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्याने बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !