जामनेर आगारातून मध्यरात्री चोरट्यांनी नवीन बस लांबवली : टायर फुटताच चोरट्याने काढला पळ

सुरक्षा रक्षक असतानाही झाली चोरी : बसला चावी ठेवल्याने चोरट्यांना आयतीच संधी


जामनेर (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : एरव्ही सर्वसामान्यांच्या घरातून भरदिवसा वा रात्री चोर्‍या-घरफोड्या होण्याचे प्रकार नवीन नाहीत मात्र जामनेरातून चोरट्यांनी चक्क आगारातून मध्यरात्री नवीन कोरी बस लांबवली. चोरट्यांनी बस लांबवल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर टायर फुटल्याने चोरट्याने बिंग समोर येण्याच्या धाकाने बस सोडून पलायन केले. या प्रकाराने मात्र चोरट्यांची वाढलेली हिंमत व आगाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

काय घडले जामनेरात ?
जामनेर बसस्थानकातून सोमवारी पहाटे नवीन बस एका चोरट्याने पळवून नेली. 15 किमी अंतरावर कोंदोलीमार्गे शहापूरकडे जाताना टायर फुटल्याने चोरटा बस वाटेतच सोडून पसार झाला.





जळगाव-जामनेर ही अखेरची फेरी मारून बस चालक अनिल कोळी यांनी कंट्रोल कॅबीनसमोर असलेल्या फलाट नंबर दोनवर लावली. नेहमीप्रमाणे चावी गाडीलाच ठेवून ते निघून गेले. त्यानंतर रात्री 11 वाजेदरम्यान एक अज्ञात व्यक्ती बेंचवर झोपला. तेथे एकही प्रवासी नाही, वॉचमन नाही हे पाहून दोन वाजून 28 मिनिटांनी त्या व्यक्तीने स्थानकातून बस चोरून कोदोली मार्गे शहापूरकडे वळवली.

बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
चोरट्याने पळवलेली ‘जिजाऊ’ बस ही एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक गाड्यांपैकी एक आहे. या बसमध्ये प्रवाशांच्या आणि गाडीच्या सुरक्षेसाठी 4 हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे, रियल-टाईम लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि इमर्जन्सी पॅनिक बटणे बसवण्यात आलेली आहेत.

वॉचमन असताना हे कसे घडले, याची चौकशी करू
अनेक बस बटण स्टार्ट आहेत. ज्या गाड्यांना चावी असते, ती चावी गाडीतच ठेवण्याची पद्धत आहे. प्रकारावरून चोरटा निष्णात चालक असावा असे दिसते. आगारात वॉचमन असताना हे कसे घडले, याची चौकशी करू. पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केल्याचे आगार व्यवस्थापक दिनेश नाईक म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !