कुंभमेळ्याचे कंत्राट देण्याच्या नावाखाली 500 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर : मंत्री गिरीश महाजनांचा दावा
जळगाव (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या नावावर कोट्यवधींच्या फसवणुकीचा धक्कादायक खेळ सुरू असल्याचा गंभीर खुलासा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कुंभमेळ्यात कंत्राट मिळवून देतो, मोठी कामे मिळवून देतो, असे आमिष दाखवत राज्यभरातून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा दावा मंत्री महाजनांनी जळगावात केला. या निमित्ताने चारशे ते पाचशे कोटी रुपयांच्या बनावट ऑडर्स देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्तांच्या नावाचा वापर
मंत्री महाजन म्हणाले की, या फसवणुकीसाठी ऑनलाईन बनावट कागदपत्रे आणि चक्क विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाच्या बनावट वर्क ऑर्डरचा वापर करण्यात आला. पोलिस कर्मचार्यांना पाणीपुरवठा, चौरंग आणि इतर कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. कागदपत्रे हातात दिली आणि त्यानंतर पैसे उकळण्यात आले. विशेष म्हणजे या ऑर्डरवर महसुक्त आयुक्त गेडाम यांचे नाव व डिजिटल स्वाक्षरी होती शिवाय क्यू आर कोड नसल्याने शंका आल्याने हा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.



जामनेरमधील दोन जणांसह धुळ्यातील एकाचा या प्रकरणात समावेश आहे. पीडितांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला.
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांकडेही तक्रार करण्यात आली आहे. आता प्रश्न आहे-कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणुकीचा हा खेळ नेमका किती मोठा आहे? आरोपींच्या अटकेनंतर राज्यभरातील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हणूनच कुंभमेळ्याच्या नावावर कोणतेही कंत्राट, वर्क ऑर्डर किंवा सरकारी काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात असेल, तर पैसे देण्याआधी कागदपत्रांची अधिकृत खात्री करा अन्यथा मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते, असेही मंत्री महाजन म्हणाले.