मुक्ताईनगरात पाच लाख 36 हजारांचा गुटखा जप्त : दोन आरोपींविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : मुक्ताईनगर शहरातील भोईवाडा परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सदृश्य अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच लाख 36 हजार 324 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला, तसेच 75 हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण सहा लाख 11 हजार 324 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अंकित संजय सापधरे (रा. भोईवाडा, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर) आणि पवन दौलतानी शेठ (रा.बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



11 ऑगस्ट रोजी रात्री कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास भोईवाडा, मुक्ताईनगर येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा केल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा व गुटखासदृश्य अन्नपदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव येथील कार्यालयातील सहाय्यक आयुक्त योगराज किशोर सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.57 वाजता मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.