तुकाराम मुंढें अ‍ॅक्शन मोडवर : राज्यभरात डॉमिनोज पिझ्झाचे पाच परवाने निलंबित


मुंबई (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : एफडीएने आपला मोर्चा थेट मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सकडे वळवला आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ’डॉमिनोज् पिझ्झा’च्या मुंबईसह राज्यभरातील पाच आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने रद्द (निलंबित) केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील चार आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

डॉमिनोज् पिझ्झावरील कारवाईने खळबळ
मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज् पिझ्झाच्या आऊटलेट्समध्ये एफडीएच्या पथकाने अचानक तपासणी केली. यात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या व पाच परवाने निलंबित करण्यात आले आहेत.






विलेपार्ले (मुंबई) आउटलेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नव्हत्या. अन्न साठवणूक, स्वच्छता आणि कीटक नियंत्रण सुविधांमध्ये मोठ्या त्रृटी आढळल्या. अन्नपदार्थ साठवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान नियंत्रण आणि तपासणीची योग्य व्यवस्था नव्हती.

आर-सिटी मॉल, घाटकोपर (मुंबई) आउटलेटमध्ये कीटक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आणि त्यांच्या नोंदी नव्हत्या. अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणार्‍या साहित्याची प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचार्‍यांच्या स्वच्छता आणि वैद्यकीय तपासणीच्या नोंदी ठेवलेल्या नव्हत्या. अन्न आणि पाण्याच्या चाचणीचे अहवाल सादर करण्यात आउटलेट अपयशी ठरले.

बोरिवली (मुंबई) येथील आउटलेटमध्येही अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ हाताळणीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले.

मुंबईव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर येथील डॉमिनोज् पिझ्झाच्या आउटलेटचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.

गोंदियातील 4 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द
तुकाराम मुंढे यांच्याच मार्गदर्शनाखाली मे, जून व जुलै 2026 दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील पाच आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची कसून तपासणी करण्यात आली. यापैकी चार कंपन्यांमध्ये औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 (नियम 1945, परिशिष्ट-‘टी’) मधील तरतुदींचे अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.

कायमस्वरूपी परवाने रद्द झालेल्या कंपन्या:
अंग्रास आयुर्वेद (वाडेगाव, ता. तिरोडा)
आदित्य फार्मास्युटिकल्स (गराडा, ता. तिरोडा)
लालशाह सेंद्रिय उत्पादने (पिंडकेपार, कारंजा)
हिलॅरियस आयुर्वेद (गोंदिया औद्योगिक क्षेत्र)
याशिवाय गोंदियाच्या रेलटोली येथील ’पाठक आयुर्वेदिक फार्मसी’ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावरील कारवाई अद्याप सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !