मुक्ताईनगर तालुका हादरला : बेलसवाडीत जुन्या वादातून 19 वर्षीय युवकाची चाकूचे वार करीत हत्या
मुक्ताईनगर (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून 19 वर्षीय युवकावर अल्पवयीन मुलाने चाकूने वार केला. चाकूच्या हल्ल्याने छातीत गंभीर दुखापत झाल्याने अबुजर रफीक शेख (19, रा.बेलसवाडी, ता.मुक्ताईनगर, जि. जळगाव) याचा मृत्यू झाला. खुनाची ही धक्कादायक घटना शुक्रवार, 14 रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8.45 वाजता बेलसवाडी गावातील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर मागील भांडणाच्या कारणावरून व सतत छेड काढत असल्याच्या कारणावरून अल्पवयीन आरोपीने अबुजर रफीक शेख याच्या छातीत चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.




गंभीर दुखापत झाल्यानंतर अबुजर याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचे वडील रफीक शेख नुरा (40) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अल्पवयीनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत. जुन्या वादातून नेमका घटनाक्रम कसा घडला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.