शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई ; 24 लाखांचा 480 किलो गांजा जप्त
धुळे (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शिरपूर तालुका पोलिसांनी अतिदुर्गम भागात गांजाच्या शेतावर छापा टाकत तब्बल 480 किलो कॅनाबिस (गांजा) जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयपाल हिरे यांना गांजा शेतीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा व संबंधित यंत्रणेला सोबत घेत छापेमारी केली. शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिदुर्गम भागातील टिटवापाणी परिसरातील शेतातून 480 किलो गांजा जप्त केला.




या कारवाईत मदन भरतसिंग पावरा (टिटवाणी, चिलारे, ता.शिरपूर) व अमित थावर्या पावरा (चितोर, ता.शिरपूर) या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची झाडे व कॅनाबिस अंमली पदार्थ जप्त केला तर पोलीस येताच आरोपी पसार झाले.
480 किलो गांजा जप्त
पोलिसांच्या कारवाईत पहिल्या आरोपी मदनसिंग पावराच्या शेतातून 15 लाख रुपये किंमतीचा अंदाजे 300 किलो कॅनाबिस अंमली पदार्थ तसेच अमित पावर्याच्या शेतातून नऊ लाख रुपये किंमतीचा 80 किलो कॅनाबिस अंमली पदार्थ जप्त केला. दोन्ही ठिकाणांहून मिळून 24 लाखांचा 480 किलो गांजा जप्त केला.
कारवाईने उडाली खळबळ
अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या गांजाच्या लागवडीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची अवैध लागवड व तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक मनोज कचरे, उपनिरीक्षक मिलिंद पवार, अंमलदार संजय चव्हाण, सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय ढिवरे, सुनील पवार, वाला पुरोहित, धनराज गोपाळ, अत्लाफ मिर्झा, इसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.