नौदल कर्मचार्याने पत्नीसह दोन मुलांची हत्या करीत स्वतःलाही संपवले
मुंबई (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचारी, त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांचे मृतदेह घरात आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, नौदल कर्मचार्याने पत्नी आणि दोन मुलांना विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये नौदल कर्मचारी, त्यांची पत्नी आणि अवघ्या तीन वर्षे व दोन महिन्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे मात्र चौघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेव्ही नगरमधील घरात चौघांचे मृतदेह
कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरातील एका घरातून चौघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, नौदल कर्मचार्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचा संशय आहे तर पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
दोन लहान मुलांचाही मृत्यू
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यापैकी एका मुलाचे वय अंदाजे तीन वर्षे, तर दुसर्या मुलाचे वय अवघे दोन महिने असल्याची माहिती आहे. एका कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नेव्ही नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नी आणि मुलांना विष दिल्याचा प्राथमिक संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात नौदल कर्मचार्याने आधी पत्नी आणि दोन्ही मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, पत्नी आणि मुलांना विष कसे देण्यात आले, या घटनेमागे कौटुंबिक किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घ
मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवले
पोलिसांनी चौघांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय नौदलाचे अधिकारीही पोलिसांच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास करत आहेत. नौदल कर्मचार्याच्या कुटुंबात नेमके काय घडले, त्याने पत्नी आणि मुलांना विष का दिले आणि त्यानंतर स्वतःचे आयुष्य का संपवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
