वर्धा जिल्ह्यातील तरुणाची भुसावळ रेल्वे यार्डात आत्महत्या

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; आधार कार्डावरून पटली ओळख


भुसावळ (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : भुसावळ रेल्वे यार्डातील रेल्वे यार्ड पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका गोदामात कुजलेल्या व गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पुरूषाचा मृतदेह आढळला होता. मृताच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरून मृताची ओळख पटली असून तो वर्धा जिल्ह्यातील ठाणेगावातील योगेश विजय वाघधरे (23) असल्याचे स्पष्ट झाले आहे. 12 जुलैला योगेश हा उज्जैनला जाण्यासाठी घरून निघाला मात्र नंतर तो घरी न आल्याने या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आल्याची पोलीस तपासात समोर आले आहे.

महिनाभरात मृतदेह कुजला
रेल्वे यार्ड जवळच्या पोलीस ठाण्यालगतच्या एका गोदामात एका पुरूषाने गळफास घेतल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी समोर आला होता तर सुरूवातीला हद्द बाजारपेठ की लोहमार्ग पोलिसांची याबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे अनोळखीने गळफास घेवून महिना उलटल्याने मृतदेह कुजल्यात धडावरील भाग दोरीला तर अन्य भाग जमिनीवर पडल्याने विविध तर्क लढवले जात होते. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात एक पाकीट आढळले. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो मिळून आल्यानंतर मृताची ओळख पटली

उज्जैनला जातो म्हणून बाहेर पडला मात्र तरुण परतलाच नाही
मयताचे नाव योगेश विजय वाघधरे (23, ठाणेगाव, ता.कारंजा, जि.वर्धा) असे असून तो 12 जुलैला उज्जैन जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता मात्र तेथे पोहोचला नाही शिवाय घरीदेखील न परतल्याने या प्रकरणी कारंजा पोलिसात 18 जुलैला हरवल्याची नोंद मृताचे वडील विजय वाघधरे यांनी केली होती.

पोलीस तपासात सत्य येणार समोर
विजय वाघधरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तरुणाने नेमकी आत्महत्या का केली ? या मागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस तपासात समोर येणार आहे. शिवाय शवविच्छेदन अहवालानंतर अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !