कुर्‍हेपानाचेसह बोदवडला सराफाला गंडा : भुसावळातील मोहम्मदअली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दोन गुन्ह्यांची उकल : पाच लाखांचा 47 ग्रॅम 48 मिली सोन्याचा मुद्देमाल जप्त


भुसावळ (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे तसेच बोदवड येथे सराफाच्या दुकानात हातचलाखी करून सोन्याचा ऐवज लांबविणार्‍या भुसावळातील आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (38, रा. पापानगर, इराणी वस्ती, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला एकूण 47 ग्रॅम 48 मिली सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याची बाजारमूल्य चार लाख 95 हजार रुपये आहे.

कुर्‍हेसह बोदवडला केली चोरी
कुर्‍हेपानाचे गावातील मुख्य रस्त्यावर प्रमोद स्वरूपचंद छाजेड (57) यांचे कमल स्वरुप ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. मंगळवार, 23 जुन 2026 रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान अनोळखी चोरट्याने दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करीत विविध दागिने पाहण्यासाठी हातात घेतले व दुकानदाराची नजर चुकवून भामट्याने एकूण तीन लाख 18 हजार 980 रुपये किंमतीचे दागिने लंपास केले होते. छाजेड यांनी भुसावळ तालुका पोलिसात सोमवार, 29 जूनला तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच पद्धत्तीने बोदवड शहरातही चोरी झाल्याने बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कुर्‍हे व बोदवड येथील चोरी भुसावळातील संशयीत मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (38, रा. पापानगर, इराणी वस्ती, भुसावळ) ने केल्याचे स्पष्ट होताच यंत्रणेने त्यास अकोला येथून अटक केली. कुर्‍हेपानाचे येथील गुन्ह्यातील 32 ग्रॅम 400 मिली तर बोदवड येथील गुन्ह्यात 15.8 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार गोपाळ गव्हाळे, नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, हवालदार संदीप चव्हाण, चालक रिजवान शेख तसेच तांत्रिक मदतीकामी गौरव पाटील, मिलिंद जाधव यांनी सहकार्य केले. आरोपींना भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !