पहुर पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या दोन दुचाकींसह जामनेरच्या चोरट्याला अटक
पहूर, ता.जामनेर (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : जामनेर तालुक्यातील दुचाकी चोरट्याला पहूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आली असून या दुचाकींची एकूण किंमत सुमारे 40 हजार रुपये आहे. आकाश सुभाष गुजर (28, रा.नांदनखेडा, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पहूर पोलिसांना दुचाकी चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले व विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली शिवाय दोन मोटारसायकली काढून दिल्या. त्यात हिरो फॅशन प्रो मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 19 बी.व्ही.8899 व हिरो स्प्लेंडर एम.एच.19 डी.के.4013) चा समावेश आहे. दोन्ळी मोटारसायकलींची एकूण अंदाजे किंमत 40 हजार रुपये आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, हवालदार सचिन चौधरी, हवालदार राहुल पाटील, दीपक पाटील, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, विकास गायकवाड तसेच चालक हेमंत सोनवणे आदींनी केली.
