पारोळा तालुका हादरला : ग्रामसभेतील हाणामारीत ग्रामसेवकाचा मृत्यू ; एकाला अटक
सात ग्रामस्थांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : जुने बिल काढण्याचा वाद जिवावर
पारोळा (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : जुने बिल काढण्याच्या वादातून ग्रामस्थांनी केलेल्या जबर मारहाणीत ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक व तितकीच संतापजनक घटना पारोळा तालुक्यातील शिवरे येथे सोमवार, 17 रोजी घडली. या प्रकरणी सात जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. प्रल्हाद पाटील (52) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. मयत ग्रामसेवकावर आज मंगळवारी त्यांचे मूळ गाव बोधर्दे, ता.पारोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण ?
पारोळा तालुक्यातील शिवरे येथे 17 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे होती. ग्रामसेवक प्रल्हाद पाटील ( 52) यांच्याशी जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी तीव्र वाद घातला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. सात जणांच्या टोळक्याने पाटील यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रल्हाद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पारोळा पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची जलद चक्रे फिरवत यातील एका मुख्य आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
मारहाणीच्या कृत्याने सर्वत्र संताप
दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी त्यांच्या बोधर्दे (ता. पारोळा) या मूळ गावी अंत्यसंस्कार बंदोबस्तात करण्यात येत आहेत. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
