जळगावात धाडसी घरफोडी : भुसावळसह बर्‍हाणपूरचे त्रिकूट जाळ्यात


जळगाव (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली प्र.बो. येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात भुसावळसह बर्‍हाणपूर व जळगावातून आरोपींना अटक करण्यात आली. रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल मिळून सहा लाख 68 हजार 790 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
शिरसोली प्र.बो. येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबटकर हे 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेपासून 5 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेरगावी गेले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला असल्याचे निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन आरोपींना अटक
तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुन्ना शहा सुलतान शहा (22, रा.ढोलकपूर पोलीस चौकी, बर्‍हाणपूर, मध्य प्रदेश) तसेच मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा (23, रा.बिस्मिल्ला चौकी, तांबापुरा, जळगाव, ह.मु. शिरसोली) याला बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी धाड येथून ताब्यात घेण्यात आले. तर जाबीर शहा जावेद शहा (20, रा.मुस्लिम कॉलनी, बडी खानकाजवळ, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. आरोपी मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी रामानंद, पारोळा आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

असा मुद्देमाल झाला जप्त
आरोपींकडून 10 हजार रुपये रोख, तीन लाख 60 हजार 790 रुपये किंमतीची 26.780 ग्रॅम वजनाची सोन्याची फॅन्सी शॉटपोत, 38 हजार रुपये किंमतीच्या 2.780 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन फॅन्सी कानातील रिंग, 70 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, एक लाख 40 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन तसेच 50 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटारसायकलचा समावेश आहे. एकूण 6 लाख 68 हजार 790 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !