धुळ्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 175 किलो भांगेच्या सनन गोळ्या जप्त

गुजरातमधून अहिल्यानगरात मादक पदार्थाची डिलेव्हरीपूर्वीच कारवाई : कंपनीसह तिघांविरोधात गुन्हा


धुळे (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणार्‍या 175 किलो भांगेच्या सनन गोळ्यांचा साठा एका कंटेनरमधून जप्त केला. या प्रकरणी मध्यप्रदेशातील चालकाला अटक करण्यात आली. या कारवाईने नशेखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रविवार, 16 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरून मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्राच्या दिशेने एका कंटेनरमधून मादक पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शाखेतील पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचला. कंटेनर (क्रमांक एम.पी.09 जी.जी.3199) अडवल्यानंतर त्यात भांगेच्या सनन गोळ्यांचा साठा आढळला.

175 किलो मादक पदार्थांचा साठा जप्त : चालकासह खरेदीदार व कंपनीविरोधात
पोलिसांनी केलेल्या तपासणीत कंटेनरमधून 175 किलो वजनाचा व चार लाख रुपये किंमतीचा 10 खोक्यांमधील मादक भांगेच्या सनन गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला तर 15 लाख रुपये किंमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला. चालक मोहम्मद साबीर मुशरफ खान (47, रा. 253, पवनपुरी, पालदा, इंदौर, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली तर मेहता आर्युवेदिक संस्थान, सनन हाऊस, इंदौर या कंपनीसह अहिल्यानगरचा खरेदीदार इरफान मकबूल शेख (रा. अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, एपीआय दीपक ढोके, अंमलदार सतीश जाधव, राहुल सानप, आरीफ पठाण, शिरीष भदाणे, सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !