भुसावळ तालुका पोलिसांची मोठी कारवाई : 8.45 लाखांचा गुटखा जप्त


भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : राज्यात बंदी असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असताना भुसावळ तालुका पोलिसांनी कारवाई करीत आठ लाख 45 हजार 300 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला तसेच पाच लाखांची इनोव्हा कार मिळून 13 लाख 45 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्री साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर नूतन परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय तायडे, हवालदार संजय भोई, हवालदार वाल्मीक सोनवणे, हवालदार सलीम शेख, कॉन्स्टेबल जगदीश भोई व लीना लोखंडे यांनी संयुक्तरीत्या सापळा रचला. बर्‍हाणपूरकडून जळगावकडे येणार्‍या मार्गावर सोमवारी रात्री सुमारे 11.20 वाजेच्या सुमारास टोयाटा इनोव्हा (एम.एच.19 ए.एक्स.3125) येताच तिला अडवण्यात आली व तपासणीत त्यात प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळली. यावेळी चालक किशन इंद्रलाल केसवानी (39, झुलेलाल मंदिराजवळ, सिंधी कॉलनी, पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आले. प्रतिबंधीत गुटखा त्याने बर्‍हाणूपर येथून आणल्याची कबुली दिली. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी संशयित आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !