पिंप्रीतील बायो पॅलेट युनिटची आमदार चित्रा वाघ यांच्याकडून पाहणी
90 टक्के अनुदानातून जय किसान महिला बचत गटाचा उपक्रम ; कृषी अवशेषांचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर
शिरपूर (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : शेतातील काडी-कचरा, कृषी अवशेष आणि जैविक टाकाऊ पदार्थांपासून बायो पॅलेट तयार करून त्यातून ग्रामीण महिलांसाठी रोजगार व उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम पिंप्री येथे राबविण्यात येत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून मानव विकास मिशनच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या बायो पॅलेट युनिटला भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी बुधवार, 19 ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव उपस्थित होत्या.
पिंप्री येथील शेतात युनिट
पिंप्री येथील श्री. मनोज उमेशसिंग राजपूत यांच्या शेतात हे युनिट कार्यरत असून, त्याचे संचालन जय किसान महिला बचत गटामार्फत केले जाते. शेतातील काडी-कचरा, विविध कृषी अवशेष तसेच इतर जैविक टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून या युनिटमध्ये बायो पॅलेट तयार केले जातात. तयार बायो पॅलेटची विक्री करून बचत गटातील महिलांना उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कृषी अवशेषांचा योग्य वापर होण्याबरोबरच त्यांचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर होत असून, पर्यावरणपूरक इंधननिर्मितीलाही चालना मिळत आहे.
आमदार चित्रा वाघ यांनी युनिटची पाहणी करताना बायो पॅलेट निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, तयार मालाची विक्री आणि महिलांना मिळणारे आर्थिक उत्पन्न याबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. महिलांच्या माध्यमातून कृषी अवशेषांचा प्रभावी वापर करून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
या उपक्रमाच्या कार्यासाठी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती नीता बाविस्कर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. यावेळी माविमचे धुळे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील, सीएमआरसी व्यवस्थापक नीता बाविस्कर, सीएमआरसी सचिव मालती सूर्यवंशी, सीएमआरसी लेखापाल प्रशांत बारी, सीएमआरसी सहयोगिनी कल्पना माळी, रविता पावरा व शिल्पा चव्हाण उपस्थित होत्या. जय किसान महिला बचत गटातील नीलिमा राजपूत, राजश्री राजपूत, वंदना राजपूत, संगीता कोळी व सपना ताई यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी पिंप्रीचे माजी सरपंच महेंद्रसिंग सिसोदिया, संजय सरदार धनगर, किशोर राजपूत, पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे, माजी उपसरपंच जितेंद्र कोळी, रामसिंग धनसिंग राजपूत, महेंद्र भगवानसिंग गिरासे, गोटु ओंकार राजपूत, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय खैरनार, राजकुमार गिरासे, अनिल गिरासे, इंद्रसिंग गिरासे, राकेश गिरासे, स्वप्निल राजपूत, हरीश राजपूत, निंबा राजपूत, दिलीप कोळी, अर्जुन भिल, अक्षय राजपूत, अविनाश कोळी, जितेंद्र धनगर, यांच्यासह पिंप्रीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी अवशेषांचा पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन, मूल्यवर्धित उत्पादन निर्मिती आणि ग्रामीण महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी, अशा विविध बाबींची सांगड घालणारा पिंप्रीतील हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरत असून, महिला बचत गटांच्या माध्यमातून अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळाल्यास कृषी अवशेष व्यवस्थापनासोबतच ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी गती मिळू शकते.


