बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिण्यांची चोरी : जळगावातील अट्टल महिला चोर जाळ्यात
जळगाव जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी : आरोपी महिलांकडून एक लाख पाच हजारांचे दागिने जप्त
जळगाव (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : बसस्थानक तसेच बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लांबवणार्या जळगावातील अट्टल महिला आरोपींच्या जिल्हापेठ पोलिसांना मुसक्या बांधल्या. विशेष म्हणजे दोन्ही महिला आरोपी या देराणी-जेठाणी असून त्यांनी यापूर्वीदेखील गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. महिलांकडून एकूण एक लाख पाच हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. जळगाव बसस्थानकातील चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
उषा चंदन ससाणे (48, रा. नारायणवाडी, इंदिरानगर, ता. चाळीसगाव, ह.मु. हरिविठ्ठल नगर, जळगाव) व अनिता विजय ससाणे (35, रा.राजीव गांधी नगर, वाघनगर, जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.



काय आहे प्रकरण ?
18 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नवीन बसस्थानकातून जळगाव ते चाळीसगाव जाणार्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. यामध्ये अंदाजे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि 5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टोंगल असा एकूण 45 हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. 20 जुलै रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी निष्पन्न
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी बसस्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी सुरू केली तसेच विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत महिलांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 226/2026 सोबतच गुन्हा क्रमांक 173/2026 आणि 212/2026 या प्रकरणांमध्येही सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, नरेश सोनवणे, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, तेजस मराठे, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बडगुजर, प्रशांत सैंदाणे, अजय अहिरे, अजय सपकाळे, नरेंद्र दिवेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली सोनवणे, सुषमा ढमढेरे तसेच नेत्रम शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख आणि पोलीस नाईक रुस्तम तडवी यांच्या पथकाने केली.

