फत्तेपूर पोलिसांची कामगिरी : ड्रग्जच्या गुन्ह्यात संशयीताला अटक
फत्तेपूर, ता.जामनेर (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : गुजरात राज्यातील भेस्तान (सुरत) येथील अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पसार असलेल्या आरोपीस फत्तेपूर पोलिसांनी वाकडी येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी करून पुढील कारवाईसाठी त्यास सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. युनूस खान मुज्जफर खान पठाण उर्फ ‘टॅनी’ (रा. गुलशननगर भेंडीबाजार, उनपाटीया, सुरत) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
संशयित स्कॉर्पिओमुळे भांडाफोड
मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकडी गावात गेल्या काही दिवसांपासून एक विनाक्रमांक स्कॉर्पिओ गाडी संशयास्पदरित्या फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी कॉन्स्टेबल अमोल लोहार व अमोल परदेशी यांना या माहितीची शहानिशा करण्याचे निर्देश दिले. माहितीची खात्री पटताच पथकाने संशयित वाहन चालकाला ताब्यात घेतले.



सुरत पोलिसांशी संपर्क अन् आरोपी निष्पन्न
ताब्यात घेतलेल्या चालकाची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव युनूस खान उर्फ टॅनी असल्याचे सांगितले. यानंतर फत्तेपूर पोलिसांनी तत्काळ सुरत पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून माहितीची पडताळणी केली. तपासात सदर संशयित हा सुरत येथील भेस्तान पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अमली पदार्थांच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोहार व अमोल परदेशी यांच्या पथकाने केली.
